
ठाणे (अतुल माने)
शिक्षण हे कोणत्याही वयात आणि परिस्थितीत घेता येते. मग ते राजकारणातील व्यक्ती असो की अन्य क्षेत्रातील. प्रत्येक व्यक्ती ही कायम विद्यार्थी असते तसेच शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा मधून श्री शिंदे यांनी कला शाखेची पदवी 77. 25 टक्के मार्क घेऊन आत्मसात केली.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ठाणे शाखेतून श्री शिंदे यांनी पदवी प्राप्त करताना अंतिम वर्षांसाठी मराठी आणि राज्यशास्त्र या दोन विषयांची निवड केली होती. त्याचे प्रत्येकी तीन पेपर त्यांनी दिले. दरवर्षी अंतिम परीक्षा ही मे महिन्यात होते , पण करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यामध्ये श्री शिंदे हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
याबाबत विशेष आनंद व्यक्त करताना एकनाथ शिंदे म्हणाले की , आपण पदवीधर नाही याची सातत्याने खंत वाटत होती. ऐन उमेदीच्या काळात काही कारणामुळे शिक्षण सोडावे लागले. पण पदवीधर व्हायचे हा ध्यास कायम होता. त्याला माझा मुलगा आणि खासदार असलेल्या श्रीकांत याने नेहमी प्रोत्साहन दिले. कुटुंबातील सर्व सदस्यांनी पाठबळ दिल्याने 2017 साली मुक्त विद्यापीठ मध्ये प्रथम वर्षांसाठी प्रवेश घेतला. आणि आज पदवी प्राप्त केली. हा दिवस माझ्यासाठी नेहमी अविस्मरणीय राहील, असेही शिंदे म्हणाले.











