सर्वांसाठी माणुसकीच्या फ्रीजचे” महापौरांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई – घरात शिजलेल्या अन्नाचा काही भाग गरीब, बेघरांना, भुकेल्यांना दिला पाहिजे या उद्देशाने भुकेल्यांच्या अन्नासाठी गरिमा फाउंडेशनने फ्रिज दिला आहे.या फ्रिजच्या माध्यमातून जास्तीत जास्त भुकेल्यांना अन्न मिळण्यासाठी माणुसकीची गरिमा आणखी वाढली पाहिजे तरच जास्तीत जास्त भुकेल्यांना अन्न मिळू शकेल,असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

गरिमा फाउंडेशनच्या वतीने प्रभादेवी येथील शाखा क्रमांक १९४ येथे नागरिकांनी दिलेले अन्न ताजे व सुरक्षित राहणे तसेच भुकेल्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे अन्न उपलब्ध होण्यासाठी फ्रिज बसविण्यात आला आहे.या फ्रिजचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज दिनांक १८ नोव्हेंबर २०२० रोजी पार पडले, त्यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात महापौर बोलत होत्या.

याप्रसंगी आमदार सदा सरवणकर, नगरसेवक श्री.समाधान सरवणकर तसेच नागरिक उपस्थित होते.

महापौर किशोरी पेडणेकर बोलताना पुढे म्हणाल्या की, कोरोना काळामध्ये गरीब-श्रीमंत हा भेदाभेद नष्ट झाला असून सर्वजण माणुसकीच्या एका भिंतीखाली एकत्र आले आहे . या काळात गरीब, बेघर कुटुंबियांचे बरेच हाल झाले असून त्यामुळे भुकेल्यांची भूक जाणून तहानलेल्यांची तहान जाणून आपण मदत करायला पाहिजे.

त्यासोबतच रुग्णालयाच्या ठिकाणी या प्रकारचे फ्रिज बसविल्यास रुग्णांना व गरोदर मातांना ताजी फळे व दूध उपलब्ध होण्यास मदत होऊ शकेल,अशी सूचना महापौरांनी यावेळी केली. प्रत्येक ठिकाणी या प्रकारचे दोन-तीन फ्रिज बसविल्यास त्याचे परीरक्षण करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करावी.जेणेकरून अन्न देणारे व घेणाऱ्यांची चांगली सोय होऊ शकेल,असे महापौर म्हणाल्या.

आमदार सदा सरवणकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, गरिमा फाउंडेशनने या ठिकाणी मोफत हा फ्रिज उपलब्ध करून दिल्याबद्दल सदर संस्थेचे तसेच महापौरांचे आभार मानत असल्याचे ते म्हणाले.