
हजारो मराठा सैनिकांच्या रक्ताने रंजित झालेल्या व त्यांच्या पराक्रमाची साक्ष असणार्या ऐतिहासिक, जगप्रसिद्ध व केंद्र सरकार द्वारे संरक्षित असा आपला “वसईचा किल्ला”. याच किल्ल्यात युरोपीय सत्तेविरुद्ध भारताने पहिला विजय मिळवला होता. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या वसई किल्ल्यात इंग्रजी नववर्षानिमित्त ३१ दिसंबर रोजी दरवर्षी शेकडोंच्या संख्येने लोक मद्यप्राशन करण्यास येत असत. न्यायालय, पंचायत समिती कार्यालय, दंडाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वसई किल्ल्यात दरवर्षी व वर्षभर हे प्रकार चालत असत. अनेक दशकांपासून सज्जन नागरिकांमध्ये याविषयी संताप व खेद व्यक्त होत होता. पण कोणत्याही संस्थे तर्फे ठोस प्रयत्न अथवा शासकीय विभागातर्फे ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नव्हते. पण टीम “आमची वसई” या सामाजिक समुहाने गत 6 वर्षापासून वसईचे वैभव असलेला किल्ला मद्य-व्यसन-अनैतिक प्रकारांपासून मुक्त करण्याचा विडा उचलला.
३१ डिसेंबर रोजी टीम आमची वसई ने भारतीय पुरातत्त्व विभाग व मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने वसई किल्ल्यात जागता पहारा दिला. किल्ल्यात सायंकाळी ६ नंतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला. या वर्षी सुमारे २० चारचाकी व ५० दुचाकी वाहनांना परत पाठवण्यात आले. मागील वर्षी अनुक्रमे ५० व १५० व त्यामागील वर्षी वाहनांची संख्या अनुक्रमे ३५० व ५०० होती.
आमची वसई ने पुढाकार घेऊन राबवलेल्या या मोहिमेचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. अश्याच मोहिमा प्रत्येक ठिकाणच्या दुर्गप्रेमी संस्थांनी राबवायला हव्या असे जागृक नागरिकांचे म्हणणे आहे. किल्ल्याचे महत्त्व सांगितल्यावर व प्रबोधनानंतर अनेक युवक युवतींनी यापुढे किल्ल्यात अनितिक प्रकार करणार नाही व करू देणार नाही असा निर्णय घेतला आहे. मद्यपान व अनैतिक प्रकार कायमस्वरूपी बंद कसे करण्यात येतील यासंबंधी वसई पोलीस व पुरातत्त्व विभागाने उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. यापुढे किल्ल्यात अवैध मद्य वाहतूक, मद्यपान, अश्लील चाळे व अनैतिक प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.











