भारतीय वंशाची भव्या लाल यांची नासाच्या कार्यकारी प्रमुखपदी नियुक्ती

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागिरक भव्या लाल यांची अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संशोधन संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

भव्या लाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या नासासाठी परिवर्तन संबंधित समीक्षा दलाच्या सदस्य आहेत. बायडन सरकारच्या अंतर्गत प्रशासनातील बदलाशी संबंधित कामांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.

भव्या लाल यांच्याकडे इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन विषयाचा व्यापक अनुभव आहे. त्या 2005 ते 2020 पर्यंत इंस्टीट्यूट फॉर डिफेन्स अॅनालिसिस सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी इन्स्टीट्यूट (STPI) मध्ये रिसर्च स्टाफ सदस्य पदावर कार्यरत होत्या.

भव्या लाल यांनी अॅटॉमिक इंजिनिअरिंग विषयात बी. एससी. आणि एम. एससीची पदवी प्राप्त केली आहे.तसंच मॅसाच्यूसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी व्यवस्थापन विषयातही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतून सार्वजनिक धोरण आणि सार्वजनिक प्रशासन विषयात पीएचडीसुद्धा केलेली आहे. सध्या त्या अॅटॉमिक इंजिनिअरिंग आणि सार्वजनिक धोरण सन्मान सोसायटीच्या सदस्यसुद्धा आहेत.

स्मिथ सोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्यूझियम आणि अंतराळ इतिहास आणि धोरणावर एका कार्यक्रमाचं आयोजनही करत असतात.अंतराळ क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल भव्या लाल यांना इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रोनॉटिक्सकडून गौरवण्यात आलं होतं, अशी माहिती नासाने दिली आहे.