कोरोना व्हायरस लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील विविध जिल्ह्यात लसीकरण सुरु झाले असून प्रथम फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या विरोधातील लस दिली जात आहे. अशातच आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणावेळी 50 वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणाार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यासाठी नोंदणी 1 मार्च पासून होण्याची शक्यता आहे.

राज्यात दररोज 45 हजारापर्यंत कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. त्याचसोबत कोविन पोर्टलवर सुद्धा 10 लाख 54 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असल्याचे ही टोपे यांनी म्हटले आहे. त्यापैकी 4 लाख 68 हजार 293 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्यात लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीकरणासाठी सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या केंद्रात सुद्धा वाढ होत असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भारतात 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरणाला  सुरुवात झाली आणि अवघ्या काही कालावधीत कोरोना लस दिलेला भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.