
शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांची ईडीने सुमारे तीन तास चौकशी केली. आंनदराव अडसूळ अध्यक्ष असलेल्या सिटी को-ऑप बँकेत सुमारे 900 कोटी रुपयांच्या घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. या घोटाळ्याबाबत अडसूळ यांची आज चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे या अडसूळ यांना याबाबत पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
आनंदराव अडसूळ हे को-ऑप क्षेत्रातील मोठं नाव आहे. राज्यातील सर्व सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांची युनियन आहे. आनंदराव अडसूळ हे गेल्या अनेक वर्षांपासून या युनियनचे नेतृत्व करतात. मुख्य म्हणजे अडसूळ यांची ही स्वतःची सहकारी बँक होती. सिटी कॉ-ऑपरेटीव्ह बँक या बँकेचे अडसूळ अध्यक्ष होते. तर त्यांचे नातेवाईक हे संचालक मंडळावर होते. या बँकेचा टर्नओव्हर सुमारे एक हजार कोटींच्या आसपास होता. मात्र ही बँक आता गेल्या दोन वर्षांपासून बुडीत निघाली आहे.
कर्ज वाटपात अनियमितता आणि एन पी ए मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक डबघाईला आली आणि अखेर बुडीत निघाली. बँकेचे काही हजार सदस्य होते. अनेक पेन्शनर खातेदार होते. पण सारेच बुडाले. याबाबत खातेदारांनी, ठेवीदारांनी अनेकदा अडसूळ यांना भेटून काही तरी मार्ग काढण्याची विनंती केली. पण आनंदराव अडसूळ यांनी कुणाचंच ऐकलं नाही. यामुळे अखेर खातेदारांनी पोलिसात तक्रार केली.
आपले पैसे परत मिळावेत म्हणून विनंती केली. मात्र, गेल्या दीड वर्षात खातेदारांना आपले पैसे मिळाले नाहीत. अनेक लोकप्रतिनिधींनी सीबीआय, आरबीआय, राष्ट्रपती यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल ईडीने घेतली. सध्या ईडीकडून याच प्रकरणाची चौकशी सुरु आहे. याच अनुषंगाने अडसूळ यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.










