
श्रीलंका आणि नेपाळमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार होत असल्याच्या बातम्या येत होत्या. आता या वृत्ताचे श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने (Sri Lanka Election Commission) खंडन केले आहे.
श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने सांगितले की, देशातील निवडणूक कायदा अशा प्रकारच्या व्यवस्थेस परवानगी देत नाही. श्रीलंकेचा निवडणूक कायदा कोणत्याही परदेशी पक्षाला श्रीलंकेत काम करू देत नाही. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख निमल पंचिवा (Nimal Punchihewa) यांनी सोमवारी हे सांगितले.
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचा हवाला देत मीडिया अहवालात असा दावा केला गेला होता की, भाजपा श्रीलंका आणि नेपाळमध्ये विस्तार करण्याचा विचार करीत आहे. आता श्रीलंका निवडणूक आयोग प्रमुखांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख निमल पंचिवा यांनी सोमवारी भारतीय सत्ताधारी पक्ष, भारतीय जनता पार्टी श्रीलंकेत राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करीत असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. ‘श्रीलंकेचा कोणताही राजकीय पक्ष परदेशातील कोणत्याही पक्षाशी किंवा गटाशी संबंध ठेऊ शकतो, परंतु आमचा निवडणूक कायदा इतर कोणत्याही परदेशी पक्षाला श्रीलंकेत काम करू देत नाही,’ असे पंचिवा म्हणाले.











