
मुंबईचा पाऊस म्हणजे त्याची बातच न्यारी असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मुंबईच्या पावसाची तऱ्हा सगळीकडे सर्व प्रसिध्द आहे. मुंबईचा पावसाळा म्हणजे हाहाकार हे नेहमीच झाले आहे. आपण मुंबईकर पाणी तुंबल की सगळं खापर महापालिकेवर फोडून मोकळं होतो. कधी आपण विचार केला आहे का ही परिस्थितीपुन्हा पुन्हा का ओढावते? महापालिका, प्रशासन आणि राज्यकर्ते यांना दोष देत आपण आपल्या चुकांकडे आणि वास्तविक मुंबईच्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेत नाही.
गटारे आणि नाले तुंबन्याच सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे आपलं स्वच्छतेच्या बाबतीत असलेली उदासीनता. आपण का नाही महापालिकेने दिलेल्या सूचनांचा पालन करत नाही? प्लास्टिक नाल्यात टाकणे, सरकारने प्लास्टिक बंदी केल्यावर लपून छपुन दुकानदाराला प्लास्टिक पिशव्या मागणे आणि तेच प्लास्टिक परत वातावरणात फेकून देणे, सॅनिटरी नॅपकिन्स शौचालयात फेकून देणे आणि त्यामुळे ड्रेनेज लाईन ब्लॉक करणे , ओला कचरा आणि सुका कचरा याच वर्गीकरण न करता कचरा कुंडीत टाकणे इ. ही सर्व आपली जबाबदारी नाही का? 2005 च्या जल प्रलयानानंतरही आपण काहीच धडा घेतला नाही. आपण त्यानंतरही सुधारलो नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई चारही बाजूने समुद्राने वेढलेली आहे त्यामुळे भरतीच्यावेळी जर का मुसळधार पाऊस पडत असेल तर पाणी समुद्रात न जाता परत शहरात फेकले जाते. मुंबईची नगररचना ही ब्रिटीशकालीन आहे. मुंबईतील गटारे व नाले ब्रिटिशांनी1860मध्ये केलेली आहेत आणि तीच अजूनही आहेत. मुंबईतील सर्व गटारे आणि नाले समुद्रात सोडली आहेत त्यामुळे समुद्राला भरती असतेवेळी जर का मुंबईत मुसळधार पाऊस पडत असेल तर वरून पावसाचे पाणी आणि गटारातून समुद्राच्या भरतीच पाणी एकाचवेळी शहरात जमून मुबईची तुंबई होती आणि शहरात हाहाकार उडतो. खरं तर स्वातंत्र्यानंतर मुंबईची लोकसंख्या दहापटीने वाढली परंतु त्याप्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तसेच नागरिक म्हणून आपणही काही जबाबदाऱ्या स्वीकारल्या नाहीत. लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना का नाही नव्या ड्रेनेज लाईन बांधल्या गेल्या? का नाही गटार व नाले यांची पाणी वाहून नेण्यासाठी क्षमता वाढवली?
सर्वात शेवटी मुंबईच्या या परिस्थितीला जबाबदार आहोत आपणच कारण आपण मुंबईची परिस्थिती लक्षात न घेता मुंबईच्या प्रगतीच्या नादात निसर्गाशी केलेली खिलवाड ही कारणीभूत आहे. रस्त्याचं सिमेंट कॉक्रीटीकरण करून पाणी जमिनीत मुरण्याचं बंद केले. दोन दिवसात चार भल्या मोठ्या धरणात पाणी मावेल एवढा पाऊस पडला आणि त्यामुळे कमी क्षमतेच्या नाल्यात अधिक प्रमाणात पाणी आले. जून महिन्याची सरासरी पावसाने तीन दिवसांत गाठली. तसेच जमिनीवर इमले बांधण्यासाठी खारपुटी बुजवल्या आणि आपल्यावर संकट ओढावून घेतलं आहे. असंच जर का पुढे चालू राहिलं तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी मुंबई आपल्याला पाण्याखाली बुडालेलं शहर म्हणून इतिहासात वाचायला मिळेल. म्हणून आताच सावध व्हा आणि सगळे मिळून यातून धडा घेवू. जबादारीही दोघांचीही आहे प्रशासनाची आणि नागरिकांचीही तरच मुंबई वाचेल.











