अनिल परब यांनी सचिन वाजे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले, कोणत्याही चौकशीस तयार

एनआयए (NIA) कोर्टामध्ये सचिन वाझे (Sachin Vaze) याने एक पत्र दिले असून, त्यामध्ये अनिल देशमुख (Anil Deshmukh) व अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

या पत्राबाबत अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन वाझे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे पत्र म्हणजे आपल्याला बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सचिन वाझे याने आरोप केला आहे की, अनिल परब यांनी त्यांना बीएमसी कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्यास सांगितले होते. याशिवाय अनिल परब यांनी सचिन वाझेला एसबीयूटी (SBUT) ट्रस्टच्या एका प्रकरणात 50 कोटी जमा करण्यास सांगितले होते.

या सर्व आरोपांचे खंडन करीत परब म्हणाले, ‘मी शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे बाळासाहेबांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन मी हे सांगतो की सचिन वाझे याने केलेले आरोप खोटे आहे. याद्वारे मला बदनाम केले जात आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘गेले काही दिवस भाजपचे लोक म्हणत होते की, ‘आम्ही अजून एक विकेट घेऊ’, यावरून असे दिसून येते की भाजपला हे आधी पासूनच माहित होते की सचिन वाझे असे काही पत्र देणार आहे. हे सर्व आरोप खोटे असल्याने मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.’