युनिकोडमध्ये मराठी लिहा आणि तावडेंना ई-मेल पाठवा

एकीकडे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पर चर्चा’ हा कार्यक्रम देशातील किती शाळा व विद्यार्थ्यांनी पाहिला आहे?,’ याची माहिती गोळा करण्याचा आणि त्याचा रीतसर अहवाल सादर करण्याचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळांना दिलेला आदेश ताजा आहे. आता राज्याचे भाषामंत्री; तसेच शिक्षणमंत्री असणारे विनोद तावडे यांनीही काहीसे त्याच स्वरुपाचे एक फर्मान काढले आहे. अर्थात, हे फर्मान २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या संदर्भात असून, त्याअन्वये २७ फेब्रुवारीस राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांत सर्वांनी युनिकोडमध्ये मराठी मजकूर लिहून तो थेट मंत्री तावडेंना पाठवावा, असे म्हटले आहे. यासंदर्भात राबविलेल्या इतरही विविध उपक्रमांचा सविस्तर ‘अनुपालन अहवाल’ही संस्थांना तावडेंपुढे सादर करावा लागणार आहे. मोबाइलवरील वापराने मराठीचा प्रसार वाढवावा, या हेतूने यंदा सरकारतर्फे मोबाइलवरील युनिकोडच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत येत्या २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’ला याची सुरुवात होत आहे. मात्र, या सगळ्याचा आता रीतसर अहवालही सादर करावा लागणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी जाहीर केलेल्या सूचनापत्रात म्हटले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संकेतस्थळावरही हा अहवाल अपलोड करावा लागणार आहे. तावडे यांच्या एका पत्राच्या आधारे या सूचना देण्यात आल्या आहेत.