
साडेतीन दशके सक्रिय असणाऱ्या नामदेव भगत यांच्यासारख्या मातब्बर नेतृत्वाची शिवसेनेत घुसमट होत होती. अखेरिला त्यांनी विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करत शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. कोणावरही टीकाटिपणी न करता सर्वाचे आभार मानत काही दिवसापूर्वीच नामदेव भगत यांनी शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्याकडे आपल्या शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
काँग्रेसमधील आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव नामदेव भगत यांनी शिवसेना सोडल्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी सदिच्छा भेट घेतली. नाना पटोळे यांनी त्यांना 1 मे रोजी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश घेण्याचेही सुचविले. तथापि नवी मुंबई काँग्रेसमधील काही मातब्बरांनी नामदेव भगत यांच्या प्रवेशाला विरोध दाखवित हालचाली सुरू केल्या. पुन्हा काँग्र्रेसमध्ये जावून स्थानिकांच्या गटबाजीमुळे आपल्या कामावर व नेतृत्वावर मर्यादा पडणार असल्याचे पाहून नामदेव भगत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नामदेव भगत यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांनी दिली.
आज सकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्र्रेसमध्ये प्रवेश केला. नामदेव भगत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला प्रबळ ग्रामस्थ चेहऱ्याचे नेतृत्व लाभणार असून राष्ट्रवादीची ताकदही वाढणार असल्याचे मानले जात आहे.












