
वृत्तसंस्था
नवी दिल्ली / देशात कोरोना लशीसाठी चक्क मारामारी सुरु असून मोठ्या प्रमाणात लशीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. या पार्श्वभूमीवर देशात परदेशी लस पर्यटनाची मागणी वाढत आहे. दिल्लीतील एका ट्रॅव्हल एजन्सीने व्हॅक्सिन टुरिझम पॅकेज जाहीर केले आहे. पॅकेजमध्ये २४ दिवसांसाठी रशिया टूर आणि स्पुटनिक-व्ही लशीच्या दोन डोसचा समावेश आहे. दोन डोसमध्ये २१ दिवसांचा कालावधी असेल. यासाठी एकून १.३ लाख रूपये प्रतिमाणसी खर्च येणार आहे.
ट्रॅव्हल एजन्सीच्या अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्त पत्राला दिलेल्या माहितीनुसार “मॉस्कोत पोहचल्यानंतर लसीचा पहिला डोस देण्यात येईल. पहिली बॅच १५ मे ला रशियासाठी रवाना झाली आहे. यामध्ये गुरुग्राममधील ३० डॉक्टरांचा सहभाग होता. तर दुसरी बॅच २९ मे ला जाणार आहे. यात दिल्लीमधील अनेक डॉक्टर्स आहेत. त्यांनी ग्रुप बुकिंग केले आहे.
व्हॅक्सिन पॅकेजमध्ये दिल्लीवरून हवाई प्रवासाचे तिकिट, ब्रेकफास्ट, डिनर आणि पर्यटन स्थळांच्या भ्रमंतीचा समावेश आहे. सध्या रशियाने भारतीयांना व्हॅक्सिनचा डोस घेण्यासाठी त्यांच्या देशात येण्याची परवानगी दिली आहे. सध्या जगामध्ये रशिया हा एकमेव देश आहे. जिथे भारतीय नागरिक लसीकरण पर्यटनासाठी जाऊ शकतात.
येथे जाण्यासाठी केवळ आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असण्याची अट आहे. यासाठी भारतातून रशियात गेलेल्या नागरिकांना क्वारंटाईन होण्याची अट घालण्यात आलेली नाही. जगात सर्वप्रथम दुबईने लसीकरण पर्यटन ही संकल्पना राबवली. मात्र आता इतर देशांप्रमाणे दुबईत देखील भारतीयांना लसीकरण पर्यटनासाठी येण्यास मनाई करण्यात आली आहे.











