IPL 2021 Final, CSK vs KKR: धोनीच ‘सुपर किंग’ , चेन्नईची कोलकत्यावर मात करून मिळविला चौथ्या आयपीएल (IPL) विजेतेपदाचा मान

चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) चौथ्या आयपीएल (IPL) विजेतेपदाचा मान मिळवला आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) या महामुकाबल्यात चेन्नईने पहिले फलंदाजी करून 192 धावांचा डोंगर उभारला होता.

पण धमाकेदार सुरुवातीनंतर मधल्या फळीच्या अपयशामुळे केकेआर (KKR) 165 धावाच करू शकले. परिणामी चेन्नईने आणखी एक आयपीएल ट्रॉफी जिंकली. धोनीच्या नेतृत्वातील सुपर किंग्स मुंबई इंडियन्सनंतर आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे.

मुंबईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल आपल्या नावे केले आहे तर, चेन्नईचे हे चौथा चॅम्पियनशिप विजय ठरला आहे. संघाच्या विजयात अनेक खेळाडूंनी आपल्या परीने योगदान दिले जे खऱ्या अर्थाने संघाच्या विजयाचे ‘हिरो’ बनले.

 डु प्लेसिसने सलामी जोडीदार रुतुराज गायकवाडसह 61 धावांची भागीदारी करून संघाच्या मोठ्या धावसंख्येचा भक्कम पाया रचला. दुसऱ्या बाजूने त्याला रॉबिन उथप्पा आणि मोईन अलीची अधिक काळ साथ मिळाल्याने तो मुक्तपणे मोठे फटके खेळत राहिला. त्याच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईने धावांचा डोंगर उभारला ज्यामुळे कोलकाता फलंदाजांवरील दबाव वाढला.

व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिलने संघाला दमदार सुरूवात करून दिली. दोंघांमध्ये 91 धावांची भागीदारी झाली. दोघांनी चेन्नई गोलंदाजानावर हल्ला चढवला आणि सुरुवातीला त्यांच्यावर तणाव आणला. पण अखेरीस ‘लॉर्ड’ शार्दूल एकाच षटकात अय्यर आणि नितीश राणा यांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला व संघाला सामन्यात कमबॅक करून दिले. निर्णायक क्षणी देखील ठाकूरने केकेआरचा मॅच-विनर राहुल त्रिपाठीला माघारी धाडलं.

शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि जोश हेजलवूडने 2 गडी बाद केले. तसेच दीपक चाहर आणि ड्वेन ब्रावोने एक गडी बाद केला. 

केकेआर फलंदाजांच्या ‘फ्लॉप शो’मुळे निर्धारित 20 ओव्हरमध्ये 165 धावाच करू शकले. कोलकातासाठी सलामीवीर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी अर्धशतकी पल्ला गाठला. पण अन्य फलंदाजांच्या आयपशामुळे संघाला जेतेपदाच्या सामन्यात मोठा पराभव पत्करावा लागला. शुभमनने 51 धावा तर अय्यरने 50 धावा ठोकल्या. यांच्याशिवाय अन्य खेळाडू मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.