मंत्रिमंडळ वाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन महिना पूर्ण झाला असला तरी तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असला तरी खातेवाटपावरून पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरू झाली आहे. ग्रामीण भागाशी संबंध असलेलं एकतरी खातं मिळावं, असं काँग्रेसला वाटत आहे.

२८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र या सरकारचं खातंवाटप व्हायला बराच कालावधी जावा लागला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती मंत्रीमंडळ विस्ताराची. तारीख पे तारीख करत आता अखेरीस ३० डिसेंबरचा मुहूर्त ठरला आहे. मात्र या विस्ताराआधी पुन्हा एकदा खातेवाटपावरून कुरबुरी सुरू झाल्या आहेत. 

ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जोडणारी ग्रामविकास आणि जलसंपदा ही खाती राष्ट्रवादीकडे तर कृषी आणि सहकार ही खाती शिवसेनेकडे आहेत. खातेवाटपाच्या चर्चेत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही बाब नजरेआड केल्यामुळे काँग्रेसचे काही नेते खासगीत नाराजी व्यक्त करतायत. त्यामुळे आता एखादं जास्तीचं खातं पदरात पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.