
ग्रुरुवार दिनांक ३ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेन्द्र मोदी कोरोना संकटवर संबोधित करणार म्हणून संपूर्ण देश टीव्ही समोर बसला होता. सगळ्यांना अपेक्षित होते देशाचे पंतप्रधान कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी धीर देतील तसेच काही उपाय योजना बाबत नागरिकांना माहिती देतील परंतु या सर्वांच्या अपेक्षा फोल ठरल्या. पंतप्रधानांनी नागरिकांना रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी रात्रौ ९ वाजता सर्वांनी मिळून ९ मिनिटांसाठी घराच्या बाहेर दिवे लावावे तसेच मोबाईल फोनचे फ्लॅश लाईट लावावे असे सांगितले.

२२ मार्चला लॉक डाऊन जाहीर केले त्यावेळी सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा , अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांना अभिवादन देण्याकरिता टाळ्या आणि थाळ्या वाजविण्यास सांगितले होते. त्यावेळी सर्व पक्षीय राजकारणी मंडळी पासून सर्व सामान्य जनतेपर्यंत सर्वांनी मोदींच्या या आवाहनास अनुकूल प्रतिसाद देवून देशात कोरोना विरुद्धच्या लढाईत सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. त्यावेळी ते आवश्यक होते आणि लोकांत विश्वास निर्माण करणे गरजेचे होते याकरीता देशाच्या पंतप्रधानांना त्रिवार सलाम. त्या इव्हेंट मुळे देशात कोरोनाची भीती दूर करण्यास मदत झाली. काही ठिकाणी अतिउत्साही लोकांनी बेशिस्तपणे ढोल ताशे वाजवत आणि गर्दी करत जमावबंदी आदेशाला केराची टोपली दाखवली आणि समस्या निर्माण केली होती.

परंतु अत्यावश्यक सेवा देणाऱ्याचे आभार मानून खऱ्या अर्थाने या सर्व आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांना संकट काळी सारा देश तुमच्या सोबत आहे हा संदेश दिला. त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले ते आवश्यक होते.
परंतु असे इव्हेंट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे समस्येचे गंभीरता कमी करणे हे होईल. पंतप्रधान म्हणून नरेन्द्र मोदी आतापर्यंतच्या भारतातील इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत आणि तसे ते कामही करीत आहेत. मी स्वतः त्यांचा प्रशंसक आहे परंतु कालच्या त्यांच्या कोरोना संबधित संदेशात घरासमोर दिवे लावण्याच्या संदेशाने चक्रावूनच गेलो.
जगभरात कोरोना धुमाकूळ घालत आहे आणि भारतातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. निजामुद्दीन तकलाबी सारख्या घटनांमुळे देशात कोरोनाचा धोका अजून मोठा झाला असताना पंतप्रधानांकडून अभ्यासपूर्ण संबोधन अपेक्षित होते. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, लॉक डाऊन यशस्वी करण्यासाठी काय करावे, सरकारने कोरोणाविरुद्ध लढण्यासाठी काय उपाय योजना केले आहेत, देशात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणते फायदे मिळणार तसेच त्यांच्या सुरक्षेची सरकार कशी काळजी घेत आहे, देशात काही ठराविक समाजाचा वर्ग लॉक डाऊन नियम पाळत नाहीत त्यावर सरकारच्या वतीने काय पावले उचलणार, कोरोणामुळे अनेक उद्योग धंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत, अनेकांचे रोजगार जाणार आहेत, देशात बेरोजगारी समस्या निर्माण होणार आहे आणि त्यामुळे सरकार काय पावले उचलणार आहे, तसेच लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर देशात अनेक ठिकाणी मजदुर स्थलांतरित होत आहेत आणि त्यामुळे कोरोणा संक्रमित होवून आरोग्य समस्या निर्माण होणार आहे अशा वेळी हे स्थलांतर रोखण्यासाठी उपाय योजना, गरीब मजदुर लोकांना कोरोना संकट काळात मदतीसाठी उपाय योजना इत्यादी अनेक विषयावर बोलता येऊ शकले असते.
देश वासियांना एक नवा विश्वास देता आला असता परंतु पंतप्रधानांनी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दिवे लावण्यास सांगून स्वतःच हस करून घेतले. देशात सर्व स्तरांतन यामुळे पंतप्रधानांवर टीका झाली. खरं तर आता आपण कारोणाच्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचलो असताना अशा प्रकारचे संबोधन म्हणजे देशवासीयांची घोर निराशा. माझ्या सारखा मोदी प्रशंसक ही बुचकळ्यात पडतो, विचार पडतो की, नरेन्द्र मोदी यांचे कोण महान सल्लागार असावेत की ज्याने असे संबोधन करण्यास सांगितले असेल?
एखाद दुसरा इव्हेंट आपण समजू शकतो. तस टाळ्या वाजवून एक इव्हेंट साजरा केला आणि देश वासियानी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना साथही दिली. कारण तेव्हा प्रश्न आरोग्य सेवकांचा मनोधैर्य वाढविण्याचा प्रश्न होता. आणि म्हणून सर्व देशांनी मोदी यांच्या टाळ्या वाजवण्याचा इव्हेंट ला साथ दिली म्हणून परत एकदा दिवे लावण्याचा इव्हेंट हे जरा जास्तच झालं. प्रत्येक वेळी इव्हेंट करावा असा नियम नाही तसेच असे करण्याने लोकांचा पंतप्रधानांवर असलेला विश्वास कमी होईल. त्यामानाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दाद द्यायला हवी कारण राज्यात कोरोणाचं आगमन झाल्यापासून आजपर्यंत दोघेही दिवस रात्र लोकांच्या संपर्कात आहेत आणि विविध उपाय योजनांची माहिती जनतेला देत आहेत तसेच धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
काही जण तर्क लावीत आहेत पंतप्रधानांच्या या दिवे लावण्याचा थेअरी मध्ये अस्ट्रोलॉजी, विज्ञान शास्त्र, धार्मिक शास्त्र वगैरे आहे परंतु या सगळ्या भंपक कथा आहेत. हा लेख लिहण्याची आवश्यकता यासाठी वाटली कारण या देशाच्या पंतप्रधानांना खूप काही कामे करायची आहेत अशावेळी असं काही तरी दिवे लावण्याचा सल्ला देवून आपलं महत्त्व कमी करून घेवू नये. दिवे आम्ही नेहमीच लावतो. आमच्या संस्कृतीत सकाळ आणि संध्याकाळी देवासमोर आणि तुळशी समोर दिवा लावण्याची प्रथा आहे मग परत रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दिवे लावण्याचा उपयोग काय?











