विजय वल्लभ कोविड केअरच्या ICU विभागात आग; 13 जणांचा मृत्यू

आज सकाळीच एक दु:खद वार्ता समोर येत आहे. विरार (Virar) मधील विजय वल्लभ कोविड सेंटर हॉस्पिटलला (Vijay Vallabh Covid Care Hospital) आग लागल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे 3 वाजता रुग्णालयातील आयसीयू विभागात आग लागली असून यात 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 21 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे अधिकारी डॉ. दिलीप शाह (Dr. Dilip Shah) यांनी दिली आहे. एसी युनिटच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत.

मृत्यू झालेल्यांमध्ये 5 महिला आणि 8 पुरुषांचा समावेस आहे. आयसीयूमध्ये 17 कोरोना रुग्ण होते. त्यापैकी 4 रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. या दृघटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी पाहायला मिळत आहे. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

कोविड केअर सेंटरला आग लागण्याची राज्यातील ही पहिलीच घटना नसून यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या कोविड केअर रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यावर शोक व्यक्त मुख्यमंत्र्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.


ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये(तळ+४) दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात आग लागली होती सदर घटनास्थळी विरार अग्निशमन दलाचे ०३-फायर वाहन उपस्थित होते.

सदरची आग अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे ०५:२० वा. सुमारास विझवली आहे. सदर घटनेत १३ रुग्णांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला असून ५ ते ६ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे असे विरार अ. केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार समजते.


सदर घटनेत मृत झालेल्या व्यक्तीची माहिती पुढीलप्रमाणे:-
१) श्रीमती. उमा सुरेश कंगुटकर, (स्त्री/वय वर्ष ६३)
२) श्री. निलेश भोईर, (पु/वय वर्ष ३५)
३) श्री. पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव, (पु/वय वर्ष ६८)
४) श्रीमती. रजनी कडू, (स्त्री/वय वर्ष ६०)
५) श्री. नरेंद्र शंकर शिंदे (पु/वय वर्ष ५८)
६) श्री. जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पु/वय वर्ष ६३)
७) श्री. कुमार किशोर दोशी (पु/वय वर्ष ४५)
८) श्री. रमेश उपयान (पु/वय वर्ष ५५)
९) श्री. प्रवीण शिवलाल गौडा (पु/वय वर्ष ६५)
१०) कु. अमेय राजेश राऊत (पु/वय वर्ष २३)
११) श्रीमती. शमा अरुण म्हात्रे (स्त्री/वय वर्ष ४८)
१२) श्रीमती. सुवर्णा पितळे (स्त्री/वय वर्ष ६४)
१३) श्रीमती. सुप्रिया देशमुख (स्त्री/वय वर्ष ४३)