पुरेशा लससाठ्याअभावी तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद

सद्यस्थितीत उपलब्ध लससाठा संपुष्टात आल्याने शुक्रवार (30 एप्रिल ) ते रविवार (2 मे) असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शनिवारपासून नियोजित 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुरेशा लससाठ्याअभावी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

या दरम्यानच्या कालावधीत, महानगरपालिकेला लससाठा प्राप्त झाला व लसीकरण सुरु होणार असेल तर त्याची माहिती प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल. तसेच नोंदणीकृत पात्र व्यक्तींनाच आता लस दिली जाणार आहे.

लसीकरणासाठी 45 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना काही केंद्रांवर रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विनम्र आवाहन करण्यात येते की, 45 वर्ष व अधिक वयोगटातील सर्व नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळेल. त्यासाठी मनात संभ्रम ठेऊ नये. लससाठा उपलब्ध होताच प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे चिंताग्रस्त होऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये.