
राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथे आज गंगामाईचे आगमन झाले. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे सलग दुसर्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात गंगामाईचे आगमन झाले आहे. काल रात्री उशीरा गंगामाईचे आगमन झाले असून चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहीत आहे. गंगामाई राजापूरात अवतरली तरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना दर्शन घेता येणार नाही.
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे गतवर्षी 15 एप्रिल, 2020 मध्ये आगमन झाले होते. अनेक दिवस वास्तव्य केल्यानंतर 21 जून रोजी गंगामाईचे निर्गमन झाले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी पुन्हा गंगामाईचे तब्बल 1 वर्ष 14 दिवसांनी उन्हाळे गंगीतीर्थस्थानी आगमन झाले. उन्हाळे येथील काही ग्रामस्थांच्या गंगामाईचे आगमन झाल्याचे आज निदर्शनास आले.
गंगामाईच्या पाण्याने पवित्र स्नान करण्यासाठी राज्यासह राज्याबाहेरील भाविक मोठ्यासंख्येने गंगेच्या वास्तव्याच्या काळात या ठिकाणी येतात. यंदा मात्र कोरोनामुळे गंगास्नानापासून भाविकांना वंचित रहावे लागणार आहे.











