सिरमला 11 कोटी, बायोटेकला 5 कोटी डोसची दिली ऑर्डर

केंद्र सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी कोविड लसींची व्यवस्था केली असून सिरम इन्स्टिटय़ूटला कोविशील्ड लसीच्या आणखी 11 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. यासाठी 100 टक्के अॅडव्हान्स रूपात 1732.50 कोटींची रक्कम दिली आहे. तसेच भारत बायोटेकला कोवॅक्सिनच्या 5 कोटी डोससाठी 787.50 कोटी रुपये अॅडव्हान्स दिले आहेत, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिले.

देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. याच दरम्यान सरकारने लसींची नव्याने ऑर्डरच दिली नसल्याचे वृत्त प्रसारित झाले. त्यावर सोमवारी आरोग्य मंत्रालयाने आकडेवारीसह खुलासा करीत प्रसारित वृत्तांचे खंडन केले. सिरम इन्स्टिटय़ूटला याआधी ऑर्डर केलेल्या कोविशील्ड लसींच्या 10 कोटी डोसपैकी 3 मेपर्यंत 8.74 कोटी डोस उपलब्ध झाले आहेत.

अदर पूनावाला यांना आमची विनंती आहे की, ते पुण्यातील असल्याने व महाराष्ट्रातच सिरम इन्स्टिटय़ूट असल्याने, काहीही करून सिरम इन्स्टिटयूटने झुकतं माप हे महाराष्ट्राला दिलं पाहिजे, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. जालना येथे पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘कुठल्याही पद्धतीने आम्हाला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. 18 ते 44 वयोगटाला लागणाऱया लसीची किंमत ही राज्य सरकार लगेच द्यायला तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकतं माप मे व जून महिन्यात असायला हवं, जेणेकरून आपल्याला अधिक गतीनं लसीकरण करता येईल. मात्र आज लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मंदावले आहे असेही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले.