कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट बरखास्त (Suspended)

अभिनेत्री कंगना राणावतचं ट्वीटर अकाऊंट बरखास्त (suspend) करण्यात आलं आहे. ट्विटरच्या नियमांचं वारंवार उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरच्या प्रवक्यांनी म्हटलंय.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाल्याचा दावा करणारं ट्वीट कंगनाने सोमवारी केलं होतं. हे ट्वीट हिंसेला चिथावणी देणारं असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. कंगनाचा ट्विटर अकाऊंट बडतर्फ करण्यात यावा अशी मागणीही अनेकांनी केली होती.

द्वेष पसरवणं आणि अपमानास्पद वागणूक देण्याविषयीच्या ट्विटरच्या नियमांचं कंगनाने उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरने म्हटलंय.

आपल्या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आलेल्या कारवाईविषयी प्रतिक्रिया देताना कंगनाने म्हटलंय, “ट्विटरने माझं म्हणणं सिद्धच केलंय की ते अमेरिकन आहेत, आणि त्यांना वाटतं की श्वेतवर्णीय म्हणून ते कृष्णवर्णीयांना गुलामांसारखं वागवू शकतात. त्यांना वाटतं की ते तुमच्या विचारांवर, भाष्यावर नियंत्रण ठेवू शकतात. पण सुदैवाने माझ्याकडे इतरही प्लॅटफॉर्म आहेत, जिथे मी माझं मत व्यक्त करू शकते, माझ्या सिनेमांमधूनसुद्धा. मी या देशाच्या तमाम लोकांच्या पाठीशी उभी आहे, ज्यांना गुलामाची वागणूक देण्यात आली, ज्यांच्यावर अत्याचार केले गेले, आणि ज्यांचा आवाज हजारो वर्षांपासून दाबला जातोय आणि अजूनही ज्यांच्या छळाला अंत नाही…”