डॉ भास्कर धाटावकर लेखमाला: शासकीय कार्यालयातील आणि खाजगी संस्था, व्यक्ति यांच्याकडील अभिलेख पुराभिलेख विभाग कशा पध्दतीने मिळविण्याचा प्रयत्न करतात…. –  भाग 20

शासकीय कार्यालयातील आणि खाजगी संस्था, व्यक्ति यांच्याकडील अभिलेख पुराभिलेख विभाग कशा पध्दतीने मिळविण्याचा प्रयत्न करतात….

महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, संस्थानीक, स्वातंत्र्यसैनिक, यांच्याकडील ऐतिहासिक घटनेचे तसेच स्वातंत्र्य चळवळीतील साक्षीदार असलेली दस्तावेज पडून राहिलेले असतात.अशी कागदपत्रे तशीच पडून राहू नयेत म्हणून व त्यांचा इतिहास संशोधकांना संशोधन करण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून ते दस्तावेज मिळवण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करीत असते त्याची महत्त्वाची माहिती इतिहास प्रेमी वाचकांना देत आहे.आपल्या या गतकालीन गौरवशाली इतिहासावर हे ऐतिहासिक दस्तावेजांचा संर्वधंन करण्यास आपणही मदत करावी अशी विनंती आजच्या लेखातून करीत आहे.

अभिलेख जसे खाजगी असतात तसे वर्षानुवर्ष शासकीय कार्यालयातून पडून राहिलेले असतात. विशेषत: ज्या तहसील कार्यालयाचा ऐतिहासिक संस्थानाशी संबंध येतो अशा कार्यालयातील अभिलेखांची तपासणी महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड 2005 पारीत झालेल्या अॅक्ट प्रमाणे तपासणी केल्यानंतर असे लक्षात येते कि या अभिलेखांचा तहसील कार्यालयातील दैनंदिन कामाशी काहीच संबंध येत नाही पण हे दस्तावेजातून अप्रकाशित घटनेवर वस्तुनिष्ठ माहिती मिळू शकते.अशा कागदपत्रांचा शोध घेण्याची मोहिम मी 2000 पासून सुरू केली आणि मी स्वता: एकूण 242 तहसिल कार्यालयाना भेटी देऊन रेकॉर्ड रूममधील अभिलेखांची तपासणी करून इतिहासावर भाष्य करण्यास, उपयुक्त ठरणार असतील अशा अभिलेखांची यादी करून ती पुराभिलेख विभागाकडे जमा करावीत अशी विनंती जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, यांना करण्यात येते आणि त्यांनी परवानगि दिल्यानंतर ही कागदपत्रे पुराभिलेख विभागात जमा करण्याची पुढील प्रक्रिया सुरू होते.

सांवतवाडी संस्थान, जंजिरा मुरूड, रायगड जिल्ह्याधिकारी कार्यालयातील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याविषयक दस्तावेज, सांगली मीरज कडील तसेच राज्य उत्पादन शुल्क मुंबई आयुक्त अशा अनेक कार्यालयातून अभिलेख संपादित केले असून ती अभ्यासण्यासाठी महाराष्ट्रातील संशोधकांना उपलब्ध झाली आहेत. शासकीय अभिलेख मिळवणे, ती प्रत्यक्षात ताब्यात घेणे हे फारसे अवघड नसते.विदर्भातून नागपूर, मराठवाडय़ातील जिल्ह्यातून औरंगाबाद येथे हे अभिलेख ठेवण्यात आले आहेत.

खरी कसोटी असते ती खाजगी व्यक्ती, संस्थान, संस्थानीक कडील दस्तावेज मिळवून घेण्याबाबत. त्यासाठी भरपूर चिकाटी, संयम असावा लागतो , त्यासाठी अभिलेखांचे राष्ट्रीय जीवनात ऐतिहासिक महत्त्व संबंधिताना समजावून सांगण्याचे कौशल्य हवे असते.विश्वास निर्माण करावा लागतो.

ज्यांच्याकडून हे दस्तावेज संपादित केले जातात त्यांची मालकी त्यांच्याकडेच राहाते, या कागदपत्रांचा संग्रह त्या देणगीदारांच्या नावे ठेवण्यात येतो.त्यांना जेव्हा गरज लागेल तेव्हा उपलब्ध करून दिला जातो.कधी कधी संबंधितानी दस्तावेजांच्या मोबदल्याच्या मागणीनुसार किंमतही अदा केली जाते.या दस्तावेजाचे प्रकाशन केल्यानंतर त्या संग्रह मालकाच्या नावांचा ठळकपणे उल्लेख केला जातो. या कागदपत्रांची अभिलेखशास्त्रानुसार जपवणूक करणे शक्य होत नसल्याने ती काळाच्या ओघात नष्ट होतात असे समजावून दिल्यानंतर अनेकजण त्यांच्याकडील दस्तावेज देण्यास तयार होत असतात.

पाटणचे सरदार दत्ताजीराव पाटणकर यांच्याकडील दस्तावेजामधून छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या हस्ताक्षरातील 1678 सालातील महत्त्वपूर्ण अभिलेख मिळाला आहे.महाराजांनी पाटणकर युध्दात धारातिर्थी पडल्यावर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे व कुटुंबाची सर्वोतोपरी काळजी घेण्याचे आश्वासन दिले आहे. हे पत्र एक शोध निबंधच होईल.

सेनापती बापट यांच्याकडील दस्तावेज त्यांचे चिरंजीव आमदार वामन बापटकडून, टिकेकर कुटुंबियांकडील कागदपत्रे सुप्रसिद्ध संपादक स्वर्गीय अरूण टिकेकरांनी एका छोटेखाणी समारंभात दिली. व्ही शांताराम यांनी चित्रपटद्वारे अजरामर केलेले डाॅ. कोटणीस यांची कागदपत्रे त्यांच्या दोन भगिणींकडून जमा करण्यात आली .अलिबागचे टिल्लू, अमरावतीचे खापर्डे अशा अनेक महामहोदयांकडून हे दस्तावेज पुराभिलेख विभागाकडून मिळविण्यात आले आहेत.

तरी अजूनी कोणाकडे अशाप्रकारचे ऐतिहासिक दस्तावेज असतील तर ते पुराभिलेख विभागाकडे जमाकडून महाराष्ट्राच्या इतिहासातील मिसिंग दुवे जोडण्यास मदत करावी अशी नम्र विनंती करीत आहे

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन. मोबाईल 835 595 7451

Dr Bhaskar Dhatavkar
Dr Bhaskar Dhatavkar