सावधान: महाराष्ट्रातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी! 10 ते 20 वयोगटात वाढताहेत कोरोना रुग्ण

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यात आता महाराष्ट्रातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. 10 ते 20 वयोगटात आता कोरोना रुग्ण वाढत असल्याचे डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे.  मार्चमध्ये 10 ते 20 वर्ष वयोगटातील तब्बल 55 हजार कोरोनाबाधित तर गेल्या महिन्यात तब्बल साडेसहा लाख नवीन कोरोना बाधित झाल्याचं तात्याराव लहानेंनी सांगितलं आहे. 

नवीन ट्रेंड मुळे रुग्ण वाढत आहेत. नवीन ट्रेंडमध्ये बाधित करण्याची क्षमता अधिक आहे. पहिल्या स्ट्रेनच्या विषाणूमुळे चार ते पाच लोक बाधित होत होते, आता मात्र 10 पेक्षा अधिक लोक बाधित होत आहेत. आधी 50 वयाच्या वरील लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होत होता आता मात्र 20 ते 40 च्या आतील रुग्ण अधिक आहेत. 5 ते 20 वयोगटातील मुलांना कोरोना संक्रमण होत आहे. पण यात 10 वयावरील मुलांना कोरोनाची अधिक लागण होत आहे, असं त्यांनी सांगितलं. 

मुलांना कोरोना होत असला तरी घाबरण्याचं कारण नाही. पालकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं लहानेंनी सांगितलं. ते म्हणाले की, राज्यात कोरोना वाढत आहे.

कोरोना रुग्णसंख्येतील हा चढ- उतार सुरु असतानाच काल  कोरोनामुळं दगावणाऱ्यांचा आकडाही चिंता वाढवणारा ठरला. काल दिवसभरात 227 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.